Share

जगभरात ‘वसुंधरा दिन’ साजरा होत असताना सकाळीच वर्तमानपत्रांतील एका बातमीने मन विषण्ण झाले. कारणही तसेच होते. सध्या उकाडा प्रचंड वाढला आहे आणि त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. मुंबईतही तापमानवाढीचा फटका पशू-पक्ष्यांसह तलावांतील माशांनाही बसला आणि दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात अनेक मासे मृत झाल्याचे दिसले. मासे मरण पडण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी तापमान वाढीमुळे पाणी प्रचंड गरम झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही उष्णतेमुळे माशांचा मृत्यू झाला होता; परंतु एप्रिलमध्ये माशांचा मृत्यू होण्याची घटना ही पहिलीच असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तलाव परिसरात बांधकाम सुरू असून गाळ व माती नदीत पडते. त्यामुळे जलप्रदूषण होत असून प्राणवायुअभावी या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पाणी गरम झाल्याने मासे मरण पावल्याचा दावा तलाव सांभाळणाऱ्या संस्थेकडून करण्यात आला आहे. दरम्यान पालिका प्रशासनातर्फे मृत मासे बाहेर काढण्यात आले असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आता याबाबतचा अहवाल जेव्हा कधी येईल तेव्हा मासे मृत होण्यामागची कारणे स्पष्ट होतील. पण तोपर्यंत मोठा काळ निघून जाईल आणि कालांतराने परत एकदा असाच प्रसंग उभा ठाकेल, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे असे का म्हणतोय, कारण आपण एखाद्या घटनेपासून कोणताही बोध घेत नाही व पुन्हा पुन्हा तो कटू प्रसंग घडत राहतो आणि आपल्या म्हणजे माणसाच्या चुकांमुळे नाहक मुक्या पशू, पक्षी, प्राणी, वृक्षवल्ली आदींचा बळी जातो. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील पंचगंगा नदीतील मासेही मोठ्या प्रमाणात मरण पावले होते. त्यावेळचे कारण वेगळे होते. पंचगंगेत आसपासच्या परिसरातील छोट्या-मोठ्या कारखान्यांतून दूषित सांडपाणी बिनधास्तपणे सोडण्यात येत असल्याने या प्रदूषित पाण्याने नदीतील माशांसह इतरही अनेक जलचरांचा बळी घेतला. या घटनेनंतर स्थानिकांनी आवाज उठविला. पण त्यापुढे काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फार दूर कशाला, आपल्या जवळच तलावांचे शहर म्हणून ज्याची ओळख होती (आता अतिक्रमणांमुळे, मोठमोठ्या हाऊसिंग प्रकल्पांमुळे अनेक तलाव बुजविले गेले आहेत) त्या ठाणे शहरातील अनेक तलावांमधील मासेही मृत पावण्याचे प्रकार अधूनमधून घडत असतात. केवळ प्रसिद्धी माध्यमांमुळे चर्चिल्या गेलेल्या किंवा ठाऊक झालेल्या काही घटना आहेत. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कित्येक घटना जागोजागी घडत असतील, ज्यांची गणनाच होत नसेल. विशेष म्हणजे नदी, नाले, समुद्र, जुन्या विहिरी, तलाव क्षेत्रे किंवा पाण्याचे अनेक स्रोत या जणू सांडपाणी, दूषित पाणी सोडण्याची हक्काची ठिकाणेच असल्याप्रमाणे आपण वागतो आणि मायबाप निसर्गाने आपल्याला सोपविलेल्या पाण्यासारख्या अमृततुल्य पाण्याचे संवर्धन आणि त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे. जलप्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषण हा एक फार मोठा चिंतेचा आणि तितकाच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. वायुप्रदूषणाला तातडीने आळा न घातल्यास आपल्या सर्वांच्याच जीवाशी खेळ होऊ शकतो, याचे भान सत्ताधाऱ्यांबरोबरच आपणा सर्वांनाच असायला हवे. पण तसे होताना दिसत नाही.

शहरात वाहनांच्या प्रचंड वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वायुप्रदूषणात फार मोठी भर पडते. तसेच वाढत्या औद्योगिकीकरणामुळेही वायुप्रदूषण प्रमाणाबाहेर वाढते. मात्र प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई झाल्यास किंवा प्रदूषण होऊ नये याची पुरेशी काळजी त्यांनी घेतल्यास वाढत्या प्रदूषणास फार मोठा आळा बसू शकतो. त्याचप्रमाणे विकासाच्या नावाखाली झाडांची, वृक्षवल्लींची होणारी प्रचंड तोड ही बाब पर्यावरणाचा तोल ढळण्यास कारणीभूत ठरते याचे भान कुणालाच राहिलेले दिसत नाही. त्यामुळेच एखादा प्रकल्प यायचा म्हटले की, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही केली जाते. तसेच प्रकल्पाच्या जागी असलेले जुने तलाव, विहिरी, नद्या इतकेच काय समुद्रही बुजविण्यात येतो. ही बाब खरंच काळजी करण्यासारखी आहे. कारण जेवढ्या प्रमाणात आपण वृक्षांची कत्तल करतो त्या मानाने झाडांची लागवड आपण करत नाही. मोठमोठाली जंगले आपण नष्ट करतो, कांदळवनांचा घास घेतो. पण त्यांची संख्या वाढावी यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही शरमेची बाब आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका वसुंधरेचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्याचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करते पण हाव मात्र नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदूषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले, तर मानवाचे भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित. म्हणूनच ‘वसुंधरा दिना’च्या दिवशी वसुंधरेला दीन करण्यापेक्षा तिचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे व ती काळाची गरज आहे.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

23 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

1 day ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

1 day ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

1 day ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

1 day ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

1 day ago