Friday, May 9, 2025

महामुंबई

‘टक्केवारी’च्या हव्यासापोटी राज्यात विजेची कृत्रीम टंचाई

‘टक्केवारी’च्या हव्यासापोटी राज्यात विजेची कृत्रीम टंचाई

मुंबई (प्रतिनिधी) : ‘टक्केवारी’च्या हव्यासापोटी खुल्या बाजारातून चढ्या दराने वीज खरेदी करण्यासाठीच राज्यात आघाडी सरकारकडून विजेची कृत्रीम टंचाई निर्माण केली जात आहे’, असा आरोप भाजप नेते आशीष शेलार यांनी शुक्रवारी केला. आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले. शेलार पुढे म्हणाले की, कमाल मागणीच्या वेळेत सुमारे सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा असताना अन्य क्षेत्रातून जेमतेम १३०० मेगावॅट वीजखरेदी केली जात आहे.


सरकारने खरेदी केलेल्या विजेचे पैसेही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी खासगी क्षेत्रांकडून वीज नियामक आयोगाकडे केल्या जात असल्याने राज्य सरकारची पत संपुष्टात आली आहे. एकीकडे थकबाकी वाढत असताना विशिष्ट खाजगी पुरवठादारांशी हातमिळवणी करून चढ्या दराने वीज खरेदी करावयाची आणि त्याचा भार ग्राहकाच्या माथ्यावर मारून टक्केवारीचे उद्योग चालू आहेत.


‘गेल्या ३ आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दीड तासांपासून ६ तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशातून सक्तीची वसुली सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्य वीज व्यवस्थापन कोलमडले आहे.


राज्यातील सुमारे २७ वीजनिर्मिती संयंत्रे बंद किंवा जेमतेम चालवली जात आहेत. विजमागणी कमी असताना करावयाची दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीज टंचाईच्या समस्येत भर घातली आहे’ तसेच ‘सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकल्यानंतर त्याची वीज कापणाऱ्या व थकबाकीचे कारण देत भारनियमन लादणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटींची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment