मुंबई : राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली दहशत माजवण्याचे काम राज्यात सुरु आहे. शिवसैनिकांचे हल्ले हे भ्याडपणाची लक्षणं आहेत. शिवसैनिकांनी दंगेखोरपणा थांबवावा, पोलिसांनी शिवसैनिकांना लगाम घालावा, असे भाजप नेते आमदार आशिष शेलार म्हणाले. तसेच एकटा येणाऱ्यांच्या गाडीवर २५ जण येणार असाल तर तुम्हीही कधी एकटे जाणार आहात ते लक्षात ठेवा, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती मोडकळीस आली आहे. राज्यात अराजकतेची स्थिती निर्माण झाली असून, गृहविभागाकडून पक्षपातीपणा सुरू आहे. पवारांच्या घरावर जाणाऱ्यांना वेगळा न्याय व राणांना वेगळा न्याय का? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. राज्यात तक्रारदार, साक्षीदार, पंच कोणीच सुरक्षित नाही. महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, सत्ताधारी दंगेशाही करत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण भाजप त्याची मागणी करणार नाही, असे शेलार म्हणाले.
काल मोहित कंबोज यांच्यावर हल्ला करण्यात आला, कंबोज यांनी सर्वात आधी मुंबईतील भोंग्याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे शिवसेनेला त्याचा विरोध आहे. हे खुप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. मोहित कंबोज यांच्या गाडीची स्थिती जर आपण बघितली तर, शिवसैनिक त्यांना मारुन टाकण्याच्या उद्देशाने आले होते की काय? असा प्रश्न निर्माण होतो. असे मंगलप्रभात लोढा म्हणाले. घटनास्थळी सीसीटीव्ही होते, पोलिस याचा तपास करणार आहे, असेही ते म्हणाले.