
सिंधुदुर्ग : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पीडित महिलेला सखी वन स्टॉप सेंटरने तिच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोहचविले.
सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासक ॲड.पूजा काजरेकर यांनी याबाबत दिलेली माहिती अशी, १८ एप्रिल रोजी कसाल बस स्थानकावर स्थानिक नागरिकांना रात्रौ ९ च्या सुमारास २० वर्षीय मुलगी एकटीच बसलेली आढळून आली. या मुलीला त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी पीडित मुलीची माहिती काढत वैद्यकीय तपासणी होऊन मिळण्यासाठी व मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र प्रशासक ॲड.पूजा काजरेकर यांच्याशी संपर्क करून पीडित मुलीला रात्रौ १० च्या सुमारास सखी वन स्टॉप सेंटर येथे दाखल केले.
केस वर्कर चैत्राली राऊळ यांनी पोलिसांकडून पीडितेच्या घरच्यांचा संपर्क क्र. घेऊन संपर्क केल्यावर समजले, पीडित मुलगी ही भिवंडी ठाणे येथील असून, तिला आई-वडील नाहीत व तिचे मानसिक संतुलन स्थिर नसल्याने चुकून ती सिंधुदुर्ग मध्ये पोहोचली. मुलीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने ती वेळोवेळी हिंसक होत होती व विचित्र बरळत होती. स्टाफ नर्स स्नेहा मोरे, योगिता परब, सुरक्षा रक्षक अभिषेक मयेकर यांनी परिस्थिती सांभाळत योग्य ती काळजी घेऊन सतत २ दिवस तिला वैद्यकीय सेवा पुरविली. समुपदेशक ॲड.रुपाली प्रभू यांनी तिचे समुपदेशन केले. २ दिवस निवासाची सोय देऊन २० एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पोलीसांच्या समक्ष पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.