उल्हासनगर (वार्ताहर) : कारचे चाक पायावरून गेल्याचा बहाणा करून एका व्यापाऱ्याला मारहाण करत असतानाच समोर उभ्या असलेल्या पोलिसावरच चॉपर उगारण्याची घटना उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसाने फोन केल्यावर तत्काळ घटनास्थळी धाव घेणाऱ्या पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांची धिंड काढण्यात आली.
रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास टेक्सटाईलचे व्यापारी माधवलाल राजपाल हे विमल कार झोनमध्ये त्यांच्या होंडा सिटी कारला मॅट टाकण्यासाठी गेले होते. तेव्हा कासीम खान या तरुणाने पायावरून कार गेल्याचा बहाणा करून राजपाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने त्याचा मित्र अरविंद गवळे याला फोन करून बोलावून घेतले.
तितक्यात नुकतीच ड्युटी संपून घरी जात असणारे गोपनीय खात्यातील प्रवीण पवार यांनी हा प्रकार बघून मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना फोन करून माहिती दिली. तितक्यातच दोन तरुण मोटरसायकल वरून आले. त्यापैकी एकाच्या हातात चॉपर होता. त्याने प्रवीण पवार यांच्याकडे त्यांच्यावर चॉपर उगारला. मात्र पवार यांनी त्याला हात दाखवत चालता हो असे दटावले.
दरम्यान पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच दोघे पळून गेले. पण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत कासीम मोहम्मद अली खान आणि अरविंद गवळे ह्या दोघांना राहत्या घरातून अटक केली. दुपारी १२ च्या सुमारास या दोन्ही आरोपींची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, ईश्वर कोकरे, पोलीस हवालदार राजाराम कुकले, पोलीस नाईक सतीश सोनवणे, विकास जरग, पोलीस शिपाई गणेश बडे, प्रदीप खरमाळे, बाबासाहेब ढकले, वसंत डोळे या पोलीस पथकाने धिंड काढली.