गौसखान पठाण
सुधागड-पाली : लहानग्यांनी गजबजलेल्या पालीतील एकमेव बालोद्यानाची काही महिन्यांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे बालोद्यान अखेरची घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, माध्यमांमध्ये या उद्यानाच्या दुरवस्थेची बातमी आल्यावर उपनगराध्यक्ष आरिफ मणियार यांनी पंधरा दिवसांत उद्यान वापरण्यायोग्य करून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र महिना उलटून गेला तरीही उद्यान ‘जैसे थे’च आहे.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन पाली ग्रामपंचायतीमार्फत लहान मुलांची गरज ओळखून येथील राम आळीमध्ये हे बालोद्यान बनवण्यात आले होते. त्यानंतर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नगरपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक झाली. दरम्यानच्या काळात उद्यानाकडे दुर्लक्ष झाले.
मात्र, नुकतीच नगरपंचायत निवडणूक होऊन नगरपंचायत प्रस्थापित झाली. यावेळी या बलोद्यानाला नवी झळाळी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र हे बालोद्यान ‘जैसे थे’च आहे. येथील पाळणे, सी-सॉ, गेट व बाकडे तुटली आहेत. तारेचे कुंपण अनेक ठिकाणी मोडले आहे.
त्यामुळे येथे गुरांचे सर्रास वास्तव असते. येथील झाडे व गवत कोमेजून गेले आहे. फरशांची दुरवस्था झाली आहे. आजूबाजूला वाहने पार्क केलेली असतात. परिणामी लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होत आहे.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन ग्रामपंचायतने संयुक्तरित्या बनवलेल्या उद्यानाकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा नाही. नगरपंचायतने उद्यानाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून नवी झळाळी द्यावी. – अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली