मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शुक्रवारच्या (२२ एप्रिल) सामन्यात वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची गाठ राजस्थान रॉयल्सशी पडेल. या लढतीच्या माध्यमातून संजू सॅमसन आणि रिषभ पंत या दोन विकेटकीपरच्या नेतृत्वाची कसोटी लागेल.
राजस्थानने ६ सामन्यांतून ४ विजयांसह (८ गुण) अव्वल चार संघांत स्थान मिळवले आहे. ताज्या गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानी आहेत. दिल्लीने ६ सामन्यांतून तीन विजयांसह ६ गुणांनिशी सहावे स्थान राखले आहे. संजू सॅमसन आणि सहकाऱ्यांसह रिषभ पंत आणि कंपनीने मागील सामन्यांत विजय मिळवला आहे.
राजस्थानने कोलकाता नाइट रायडर्सवर मात केली. दिल्लीने एकतर्फी लढतीत बुधवारी पंजाब किंग्जवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात दोन्ही संघांसमोर विजयी कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आहे.
दिल्ली कॅपिटल्सला कोरोनाने ग्रासले आहे. दोन परदेशी क्रिकेटपटूंसह सहा जणांना विषाणूची बाधा झाली. त्यामुळे बुधवारचा सामना पुण्याऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यानंतर आज होणारा सामनाही वानखेडे स्टेडियमवर हलवण्यात आला. पुण्याऐवजी मुंबईत खेळण्याचा फायदा दिल्लीला झाला. पंजाबविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. राजस्थानविरुद्ध खेळताना त्याचा मानसिकदृष्ट्या फायदा होईल.
राजस्थानसाठी जोस बटलरचा (२ शतके, २ अर्धशतके) फॉर्म निर्णायक ठरला आहे. मात्र, त्याची बॅटिंग सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी पुरेशी नाही. शिमरॉन हेटमायर आणि संजू सॅमसनने प्रत्येकी एक अर्धशतक झळकावताना थोडा प्रतिकार केला तरी त्यांची फलंदाजी लौकिकाला साजेशी नाही. आघाडीच्या फळीतील देवदत्त पडिक्कल, करूण नायर, व्हॅन डर ड्युसेन यांना अद्याप हवा तसा सूर गवसलेला नाही. गोलंदाजीतही लेगस्पिनर युझवेंद्र चहलने १७ विकेट घेत एकहाती बॉलिंगचा भार वाहिला तरी अन्य गोलंदाजांनी निराशा केली. ऑफस्पिनर आर. अश्विन, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या अनुभवींसह एम. प्रसिध कृष्णा यांना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखता आलेले नाही.
कोरोनाने पछाडले तरी दिल्लीच्या क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास जराही ढळलेला नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (३ अर्धशतके) आणि पृथ्वी शॉ याने (२ अर्धशतके) फलंदाजीत छाप पाडली तरी कर्णधार रिषभ पंत, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल यांना अद्याप सूर गवसलेला नाही. मात्र, फलंदाजांचे अपयश मध्यमगती गोलंदाज खलील अहमद (१० विकेट) आणि लेगस्पिनर कुलदीप यादवने (१३ विकेट) थोडे फार भरून काढले आहे. मात्र, अन्य बॉलर्सची त्यांना पुरेशी साथ लाभलेली नाही.
कॅपिटल्सचे पारडे जड, पण …
दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील मागील पाच आयपीएल सामन्यांचा विचार करता कॅपिटल्सनी प्रतिस्पर्ध्यावर ४-१ अशी मोठी आघाडी घेतली आहे. मागील हंगामात पहिल्या टप्प्यात विजय मिळवत राजस्थानने दिल्लीची सलग तीन विजयांची मालिका खंडित केली. मात्र दुसऱ्या टप्प्यात बाजी मारताना कॅपिटल्स संघ पुन्हा विजयीपथावर परतला.