Friday, May 9, 2025

रायगड

नेरळ-कळंब रस्त्यावरील काँक्रिटचे रखडलेले काम पुन्हा सुरू

नेरळ-कळंब रस्त्यावरील काँक्रिटचे रखडलेले काम पुन्हा सुरू

नेरळ (वार्ताहर) : माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम मंजूर आहे. त्या रस्त्यावर ९०० मीटरचा भाग सिमेंट काँक्रिटचा बनवला जाणार आहे. त्यापैकी चार मीटर रस्त्याचा एक भाग काँक्रिटीकरण झाल्यांनतर महिनाभर बंद असलेले काँक्रिटचे काम पुन्हा सुरू झाले आहे. मात्र ९०० मीटर लांबीचा रस्ता पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण होऊन तयार होणार काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


नेरळ साई मंदिर नाका ते कळंब रस्त्यावर ९०० मीटरचा रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे. त्या रस्त्यावर चार मीटर भागात एक लेन काँक्रिटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. त्याची दुसरी बाजू आणि उर्वरित ५०० मीटर रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, हा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा महिन्यावर आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेडर कंपनीला काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्यासाठी सूचना करण्याची गरज आहे.


या रस्त्याचा ४०० मीटर लांबीचा एक भाग पूर्ण असून दुसऱ्या लेनचे काम सुरू झाले आहे. पण त्यापुढील ५०० मीटर लांबीचा रस्ता याचे काम कधी सुरू होणार, याबद्दल संभ्रम आहे. दुसरीकडे, पावसाळा तोंडावर आला असल्याने आणि ज्या ५०० मीटरच्या भागातील रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग खोदाईही करून ठेवली आहे.


पावसाळ्यापूर्वी काम होणे गरजेचे

त्यामुळे पावसाळा वेळेवर सुरू झाला आणि पाणी रस्त्यावर साठून राहिल्यास मोठी अडचण रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यास निर्माण होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने काँक्रिटीकरणाचे काम तत्काळ हाती घेण्याची गरज आहे, अशी मागणी नेरळ येथील जय मल्हार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्रावण जाधव आणि इको रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केशव तरे यांनी केली आहे.

Comments
Add Comment