जम्मू : जम्मू-काश्मीरच्या जलालाबाद सुंजवान भागात शुक्रवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
जलालाबाद सुंजवान भागात जैश-ए-मोहम्मदचे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या भागाला वेढा घातला. मध्यरात्री सुरू झालेली ही चकमक शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती. यामध्ये सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल शहीद झाले. तर चार जवान जखमी झाल्याचे जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत कठुआचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बलराज सिंह, अखनूरचे एसपीओ साहिल शर्मा, ओडिशाचे प्रमोद पात्रा आणि आसामचे अमीर सोरण हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीमुळे जम्मूच्या काही भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.