
अरुण म्हात्रे
९५व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनाचे पडघम वाजू लागलेत खरे. पण उदगीर येथे जमणाऱ्या साहित्यिकांपेक्षा, दि. २२, २३, २४ एप्रिल या तीन दिवसांत उदगीरच्या महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी म्हणून सजलेल्या मंडपाच्या डोक्यावर सूर्याची आणि ऐन उन्हाळ्यात, मराठवाड्यातील कडक उन्हाची आणि ४० अंशांहून जास्त असणाऱ्या तापमानाची चर्चा अधिक आहे. कार्यक्रम पत्रिकेतून पटकन नजर टाकली की, अनेक महत्त्वाच्या किंवा लोकप्रिय लेखकांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट दिसते. अर्थात हे उन्हाच्या भीतीने की डिसेंबरनंतर ताबडतोब ४ महिन्यांनी आलेल्या संमेलनाची पुनरावृत्ती लेखकांच्या पचनी पडली नाही?
या संमेलनाच्या जमेच्या बाजूपैकी एक म्हणजे मराठवाड्यात अधिक काळ वास्तव्य केलेले व मनाने मराठवाड्याचे असलेले सर्जनशील लेखक, विख्यात कादंबरीकार भारत सासणे हे अध्यक्षपदी आहेत आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री नामदार अमित देशमुख हे या संमेलनाच्या मागे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उभे आहेत. स्वागताध्यक्ष संजय बनसोडे आणि कार्याध्यक्ष बसवराज पाटील अशा दमदार राजकीय पाठिंब्याच्या बळावर हे संमेलन यशस्वी होईलच, पण कविसंमेलने, भाषणे, परिसंवाद, कार्यक्रम, पुस्तक विक्री आणि पाहुण्यांची निवासव्यवस्था या सर्वांची चोख यशस्विता सांभाळण्याचे अवघड काम आयोजकांच्या माथ्यावर आहे.मागासलेपणाचा शिक्का बसलेला मराठवाडा, साहित्य, संगीत आणि लोककला यात पुढे आहे. मात्र स्वामी रामानंद तीर्थ यांच्यापासून रुजलेली मराठवाड्याची अस्मिता, अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या मदतीला धावून येईल आणि संमेलन तात्त्विकदृष्ट्या मोठ्या हौसेने घेतलेली जबाबदारी पार पडेल, असा विश्वास आयोजकांना आहे.
एका अर्थाने हे संमेलन मराठवाड्याचे संमेलन आहे. संपूर्ण संमेलनात मराठवाड्यातील कवी/ लेखक/समीक्षक/कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग आहे. डॉ. गणेश देवी, दामोदर मावजो, पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. दिलीप घोंगडे, राजन गवस, वीणा गवाणकर, प्रकाश भातंब्रेकर, मोनिका गजेंद्रगडकर, आप्पासाहेब खोत, प्रमोद मुनघाटे अशी मोजकी मंडळी सोडली तर संपूर्ण संमेलनात मराठवाड्यातील प्रतिभावंतानाच संमेलन तारून नेण्याचे काम करावयाचे आहे/बोलणारा मराठवाडा नि ऐकणाराही मराठवाडाच, असे एकूण संमेलनाचे स्वरूप असणार आहे. इथलीच मंडळी आणि त्यांचा परिचित आवाज यामुळे रसिकवर्ग फिरकणार नाही, या शंकेपोटी बहुधा, अजय-अतुल संगीत रजनी, चला हवा येऊ द्या, अवधुत गुप्ते संगीत रजनी असे मनोरंजनाचे टीव्हीफेम कार्यक्रम, संमेलनात घुसले आहेत. साहित्याशी फार संबंध नसलेल्या या कार्यक्रमाचे उपरेपण पत्रिकेत ठळकपणे जाणवते. कदाचित, त्यांचे अस्तित्व हाच संमेलनाच्या एकसुरीपणावर उतारा ठरावा. संमेलनाच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पाऊस पडेल या हवामान खात्याच्या अंदाजाने साहित्य रसिकांत मोठी खळबळ उडाली असेल आणि आयोजकांच्या चिंतेत भर पडली असेल. परळी येथे झालेल्या संमेलनात, पावासाने संमेलनाला झोडपून काढले होते. त्याच्या आठवणी मराठवाडा विसरला नाही.
साहित्य संमेलनाला एक लाडका उत्सव म्हणून जाणाऱ्या साहित्य रसिकांना उत्तम निवासव्यवस्था, उत्तम हवामान, उत्तम जेवण आणि माफक प्रवास अशा गोष्टी लागतात. लोकप्रिय लेखकांच्या भेटी हा एक बोनस असतो आणि संमेलनस्थळाच्या आजूबाजूला काही प्रेक्षणीय स्थळे असली, तर त्याचे आकर्षण असते. अशा संमेलनाळू रसिकांना उदगीरचे संमेलन ‘ड्राय’ वाटले तेर त्यात चुकीचे नाही. मात्र, मराठवाड्यातील लोकांचे अगत्य ज्यांना ठाऊक आहे, त्यांना इतक्या उन्हाच्या कचाट्यातही उदगीरला जावेसे वाटेल, कारण
तडतडणारे उन्ह साहतो मराठवाडा
तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा
ही मराठवाड्याची ओळख तिथल्या अभावग्रस्त गोष्टी इतकीच पक्की आहे.