कल्याण (वार्ताहर) : जीवनात खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. खेळाडू वृत्ती असल्यास जीवनात कोणत्याही समस्येला समोरे जाता येते, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कल्याण पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि हनुमान सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप कार्यकर्ते अरुण दिघे यांच्या स्मरणार्थ बुधवारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
याप्रसंगी फडणवीस यांनी कबड्डी हा आपल्या मातीतील देशी खेळ आहे. या प्रकारच्या स्पर्धा आयोजनातून कबड्डी खेळणारे खेळाडू हे तालुका, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर जावेत, अशी आपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मातीत कबड्डीचे चांगले खेळाडू घडले असल्याचे सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमास आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.