Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणआरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार - आ. नितेश राणे

आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार – आ. नितेश राणे

कणकवली : केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. या योजनांबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची असून या कामात लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार असून जन आरोग्य योजना जनतेचा आधार आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आ.नितेश राणे बोलत होते. या मेळाव्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आमदार नितेश राणे म्हणाले, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना यासह अन्य आरोग्य विषयक योजना आहेत. याची माहिती जनसामन्या पर्यंत पोहचवली पाहिजे. यातूनच या योजनांचा लाभ नागरिकां घेता येईल. या योजनांची जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गावोगावी जनजागृती केली पाहिजे.तसेच याचे बॅनर लावून हि प्रसिद्धी केली पाहिजे. या कामी आरोग्य यंत्रणेने स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदत घ्यावी. तसेच ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांचे आरोग्य सुदृढ व उत्तम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम केले पाहिजे, असे सांगतानाच केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे देऊन डिजिटल हेल्थ कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश खलिपे, वैद्यकीय अधिकारी संतोष चौगुले, नगरसेवक संजय कामतेकर, अण्णा कोदे, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, मेघा गांगण, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सी.एस.शिकलगार, डॉ. विद्याधर तायशेटे, संदीप मेस्त्री,प्राची कर्पे,साक्षी वाळके मनोहर परब,आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या आरोग्य मेळाव्यात डिजिटल हेल्थ आयडी काढणे, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढणे, सर्व आजारांची तपासणी, चाचणी व उपचार, टेलिकम्युनिकेशन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, गर्भनिरोधक साधनांचा वापर कसा करावा याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येकाने आपल्याआरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी याबाबत उपस्थितांना स्टॉल लावून मार्गदर्शन केले. याशिवाय राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची माहिती तसेच गर्भवती स्त्रियांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि कोणता आहार सेवन करावा याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली. याशिवाय मेळाव्यात आलेल्या शेकडो नागरिकांची डॉक्टरांनी विविध तपासणी करत आजारांवरची औषधे मोफत दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले. सूत्रसंचालन आरोग्य सेविका नयना मुसळे यांनी केले. आभार मनोहर परब यांनी मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -