मुंबई (प्रतिनिधी) : चेन्नई सुपर किंग्जचा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डेवॉन कॉन्वे याने आयपीएलच्या जैव सुरक्षेतून (बायो-बबल) बाहेर पडताना मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. २३ जुलै २०२०मध्ये त्याने गर्लफ्रेंड किम वॉटसनसोबत साखरपुडा केला. आता दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. त्याच्या लग्नाच्या आधीचा सोहळा चेन्नईच्या क्रिकेटपटूंनी दणक्यात साजरा केला.
कॉन्वे हा त्याच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेत परत जाणार आहे आणि त्यामुळे किमान आठवडाभर तो आयपीएलपासून दूर राहणार आहे. न्यूझीलंडचा हा सलामीवार २४ एप्रिलला पुन्हा चेन्नईच्या ताफ्यात परतणार आहे. पण, कोरोना नियमांमुळे त्याला तीन दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यामुळे किमान दोन सामने त्याला खेळता येणार नाहीत.
कॉन्वेने यंदाच्या हंगामात एकच सामना खेळला आहे. आयपीएलच्या १५व्या पर्वात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला ६ सामन्यांत केवळ एकच विजय मिळवता आलेला आहे. सातत्य राखण्यासाठी त्याच्यासारख्या फलंदाजाची संघाला गरज होती. मात्र विवाह होणार असल्याने त्याला आयपीएल सोडून जावे लागत आहे.
यंदाच्या आयपीएल लिलावात चेन्नईने या किवी क्रिकेटपटूसाठी एक कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. कॉन्वेने २० आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यांत ५०.१६च्या सरासरीने ६०२ धावा केल्या आहेत. नाबाद ९९ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. डेव्हॉन कॉन्वेचा जन्म दक्षिण आफ्रिकेतला असला तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो. ३० वर्षांच्या कॉन्वेने नोव्हेंबर २०२०मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मॅथ्यू सिंक्लेअर यांच्यानंतर कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉन्वे हा न्यूझीलंडचा दुसरा, तर जगातला सातवा फलंदाज आहे.