बोईसर (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसीमधील केमबोंड केमिकल नामक कारखान्यात गुरुवारी (ता. २१) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कारखान्याच्या व्यवस्थापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुलेश पाटील (वय. ५३) असे मयत व्यवस्थापकाचे नाव होते,ते पालघर तालुक्यातील रामबाग गावचे रहिवासी होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, आगीत कारखाना खाक झाला आहे.
वाहनांच्या चेसिसला लागणारे सोल्युशन तयार करणाऱ्या तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक ई ६ / ३ आणि मधील केमबॉण्ड केमिकल्स या कारखान्यात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन कारखान्याला आग लागली होती. या आगीने तत्काळ भीषण रूप धारण केल्याने आगीच्या धुराचे लोळ आकाशात दिसत होते. आग लागताच अलार्म वाजल्याने कामगारांनी कारखान्यातून बाहेर पडत आपला जीव वाचवला. आगीच्या घटनेवेळी कारखान्यात ६० ते ७० कामगार उपस्थित होते.
सर्व कामगार सुखरूप असताना कारखाना व्यवस्थापक दुलेश पाटील यांचा जळून मृत्यू झाला आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसीचे तीन, बीएआरसी, पालघर नगर परिषद आणि अदाणी पॉवर कंपनीचे मिळून सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवाननांना यश आले आहे. दरम्यान, कारखान्याला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामगारांचा बळी जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या घटना
९ मार्च २०२२ निर्भया रसायन
२३ डिसेंबर२०२१ केमो ल्युशन केमिकल्स
११ सप्टेंबर २०२१ रंग रसायन