मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या दोन परदेशी क्रिकेटपटूंसह सपोर्ट स्टाफमधील चारजणांना कोरोनाची लागण होऊनही पंजाब किंग्जवर मात करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेटपटूंचे संघमालक पार्थ जिंदाल यांनी विशेष कौतुक केले आहे. त्यांनी खास ट्वीट करताना आपल्या भावना व्यक्त केल्यात.
जरा विचार करा, चार दिवस तुम्ही एकाच खोलीत बंद आहात. तुम्हाला सांगितलं जातं की, तुम्ही ज्या मित्रासोबत डिनर केलंत तो खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर असंही सांगितलं जातं की, तुम्हाला जगातील सर्वात मोठी टी-ट्वेन्टी लीग आयपीएलमध्ये जाऊन सामना खेळायचा आहे. त्यावेळी तुम्ही समोरच्या संघाची अवस्था ८ बाद ९२ अशी करता… ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे. हे दिल्ली कॅपिटल्सचं खरं स्पिरीट आहे.
मी खरंच संघाच्या आजच्या कामगिरीने भारावून गेलोय. मला या संघातील खेळाडूंबद्दल प्रचंड आदर वाटतोय. कम ऑन दिल्ली कॅपिटल्स… असेच झुंजार राहा. माझा संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना सलाम, असं प्रेरणादायी ट्वीट पार्थ जिंदाल यांनी केले आहे.
आयपीएलच्या बायोबबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. दिल्लीच्या संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे बुधवारच्या पंजाबविरुद्धच्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते. शेवटी सामना झाला आणि त्यात दिल्लीने पंजाबवर एकतर्फी विजय मिळवला. दिल्लीच्या ताफ्यातील फिरकीपटू अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि ललीत यादव यांनी अचूक आणि प्रभावी गोलंदाजी करत पंजाबला ११५ धावांवर रोखले. तिथेच दिल्लीचा मोठा विजय निश्चित झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी शानदार फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स संघाला ९ विकेट राखून मोठा विजय मिळवून दिला.