मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज ‘मातोश्री’ बाहेरून जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार शुक्रवारी
रात्री घडला. मोहित कंबोज हे ‘मातोश्री’ बाहेर उभे राहून रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला, तर या हल्ल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
साधारणपणे रात्री साडेनऊ वाजता मोहित कंबोज हे कलानगर परिसरातून जात होते. मोहित कंबोज यांची गाडी दिसल्यानंतर शिवसैनिकांनी त्यावर हल्ला केला. शिवसैनिकांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
भाजप नेते आणि आपण एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणाहून परतत असताना कमलानगरच्या जंक्शनच्या ठिकाणी माझ्या गाडीवर हल्ला केला, असे मोहित कंबोज म्हणाले.
मोहित कंबोज चार-पाच गाड्यांसह त्या ठिकाणी आले होते. त्यांनी या परिसराची रेकी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना उत्तर दिले. शिवसैनिकांना डिवचू नका, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी
दिली आहे.