सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याचा मानस
अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण कार्यक्रमाअंतर्गत अलिबाग परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र चार वर्षे झाली तरी हा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. जवळपास ८९ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य केले आहे. आपत्ती धोके निवारण कार्यक्रमातून राबवण्यात येणारा हा राज्यातील दुसरा प्रकल्प ठरणार आहे. दरम्यान, सप्टेंबरअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
जागतिक बँक, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत अलिबाग शहर व संलग्न गावांत भूमिगत विद्युतप्रणाली प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मे २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्यापपर्यंत या प्रकल्पाचे केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे.
अलिबाग शहर तसेच त्याला लागून असलेल्या चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीच्या काही भागात भूमिगत विद्युतप्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ८९ कोटी रुपये इतका खर्च होणार आहे. चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी उपरी तारमार्ग (ओव्हरहेड वायर) तुटून, पोल कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवितहानी होत असते. शिवाय, विद्युत पुरवठा खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी भूमिगत विद्युतप्रणाली तयार करून सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे काम रखडले होते. दरम्यान, आता या कामाला गती मिळाली असून जवळपास ५० टक्के काम पूर्णही झाले आहे. तथापि, उर्वरीत काम सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे शहरातील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण तर होईलच, शिवाय ओव्हरहेड वायर काढण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
७.९ चौ.किमी परिसरात राबवणार प्रकल्प
अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत व वरसोली ग्रामपंचायतीचा काही भाग येथे हे भूमिगत केबलिंग केले जाणार आहे. तसेच अलिबाग शहरातील २२/२२ के.व्ही. अलिबाग स्विचिंग स्टेशनचेही नुतनीकरण होणार आहे. या प्रकल्पात एकूण २७ किलोमीटर लांबीची उच्चदाब वाहिनी व ४५ किलोमीटर लांबीची लघुदाब वाहिनी भूमिगत टाकली जाणार आहे. ७.९ चौ.किमी परिसरात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यात एकूण ११८ रोहित्र, ७८ आरएमयु यांचाही समावेश आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी ट्रॅचिंग व ट्रॅच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग करणे या पद्धतीचा वापर होईल. केबलसाठी जमिनीखाली ०.८ ते १.२ मीटर खोल खड्डा असेल तर रोहित्र जमिनीपासून १.५ मीटरवर असतील. प्रकल्पासाठी ८९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले आहे. चेंढरे, वरसोली क्षेत्रातील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शहरातील उर्वरीत कामेही प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कामे सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रश्न यामुळे निकाली निघेल. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. – कुंदन भिसे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग