अलिबाग (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत आहे. खासगी आणि प्रवासी वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत, पण पर्याय काय? लाखो रूपये खर्चून घेतलेली गाडी पांढरा हत्ती बनून घरात ठेवण्यातही अर्थ नाही. पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजीवरील वाहने परवडणारी आणि प्रदूषण कमी करणारी असतात. यामुळे या सीएनजीच्या गाड्या बाजारात आल्या. पण सीएनजी पंपाची कमतरता असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत, अशा प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.
अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर असल्याने जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरील लोक कामानिमित्ताने अलिबागमध्ये मोठ्या संख्येने येत असतात. शिवाय, अलिबाग-मुरुड या दोन तालुक्यांना पर्यटक पसंती देत असल्याने सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची दोन्ही शहरांत गर्दी असते. खासगी वाहनाने येणारे पर्यटक पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या घेऊन येतात.
पेट्रोल-डिझेल पंप पुरेशा संख्येने शहरात व शहराबाहेर असल्याने त्यावर चालणाऱ्या वाहनांना कोणतीच अडचण येत नाही; परंतु, सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना अलिबागपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले चौल, २२ लोमीटर अंतरावरील वडखळ आणि ३० किमी अंतरावरील पेण हे तीन पर्याय आहेत. तथापि, तिथे गेल्यावर सीएनजी मिळेलच याची खात्री नाही. शिवाय, तासनतास रखडपट्टी ठरलेली आहेच.
विशेष म्हणजे सीएनजी किट असलेली प्रवासी वाहतूकसेवा देणारी वाहनेसुद्धा मोठ्या संख्येने रस्त्यावर धावत आहेत. अलिबागमधील तीन आसनी आणि सहा आसनी प्रवासी रिक्षाचालकाला सीएनजी भरण्यासाठी चौलला जावे लागते. तेथे गर्दीमुळे किंवा उपलब्ध नसल्यास वडखळ किंवा पेणपर्यंत जावे लागते. यात वेळ आणि इंधन दोन्ही खर्च होते. यामुळे येथील वाहनचालक अलिबाग शहरात सीएनजी पंप असावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
कमी खर्चात प्रवास करता यावा म्हणून आम्ही सीएनजीवरील गाडी घेतली. तथापि, जवळपास सीएनजी पंपच नसल्याने कुचंबणा होत आहे. विनाकारण चौल किंवा वडखळला जाऊन रांगेत उभे रहावे लागते. सरकारने सीएनजीवरील गाड्यांना प्रोत्साहन दिले असेल तर त्या तुलनेत पंपदेखील उपलब्ध करून द्यायला हवेत. अलिबागला सीएनजी पंप व्हायलाच हवा.
– रमेश पाटील, वाहनधारक