नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतमधील रस्त्यांवर खोदकाम करून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्या टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांना जलवाहिन्या काढण्याची नोटीस बजावली असून जलवाहिन्या न काढल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे कोल्हारे ग्रामपंचायतला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
कोल्हारे ग्रामपंचायतने नळपाणी योजना राबवण्यासाठी जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्या जलवाहिन्या या ग्रामपंचायत हद्दीतून टाकताना माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग, भीमाशंकर राज्यमार्ग, लोभेवाडी-पिंपळोली-नेरळ जिल्हामार्ग हे रस्ते खोदून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्या जलवाहिन्या टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानग्या घेतल्या नाहीत, असा आरोप लेखी निवेदन देऊन कोल्हारे ग्रामपंचायतच्या एका सदस्याने केला आहे.
त्यांच्या अर्जानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर १८ एप्रिल रोजी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्यांनी कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांना लेखी पत्र पाठवून नेरळ-कळंब, नेरळ- लोभेवाडी, नेरळ-कशेळे या तीन रस्त्यांवर तब्बल चार ठिकाणी रस्त्यावर क्रॉसिंग आणि रस्त्याच्या कडेची साईडपट्टी खोदून कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांनी त्या जलवाहिन्या टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली असेल ती परवानगी तत्काळ कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सात दिवसांत कागदपत्रे सादर न केल्यास कोल्हारे ग्रामपंचायतने सदर जलवाहिन्या काढून टाकण्याची सूचना लेखी आदेशात सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. मात्र परवानगी नाही आणि तरीदेखील जलवाहिन्या काढून टाकली नाही तर मात्र कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.