प्रशांत जोशी
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवून ‘स्वच्छ सुंदर शहर’ राखण्यावर भरपूर भर दिला. या उपक्रमासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधीही खर्ची केला. ओला-सुका कचरा वर्गीकरण करून खतनिर्मिती करून ते खत विविध संस्थांना दिले. यामुळे पालिका प्रशासन स्वच्छतेसाठी अग्रेसर आहे अशी प्रसिद्धीही मिळाली; परंतु असे असले तरी शहरात काही ठिकाणी अद्याप पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे कचऱ्यांचे नवे डम्पिंग ग्राऊंड तयार होत असल्याची चर्चा होत आहे. फक्त भिंती रंगवून स्वच्छता होणार नाही, तर प्रत्यक्षात उपाययोजना अमलात आणा, अशी मागणी डोंबिवलीकर करीत आहेत.
कल्याण-डोंबिवली पालिकेचे आरोग्यखाते लक्ष देऊन असले तरी मात्र काही ठिकाणी आजही रस्त्यानजीक कचरा टाकण्यात येतो, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. पूर्वेकडील स्टारकॉलनी चौकासमोरील रस्त्यावर आजही रस्त्याशेजारी कचरा टाकून तो जाळण्यात येतो. तीच परिस्थिती औद्योगिक विभागातील हॉटेल नंदी पॅलेस रोडवर आहे. या दोन्ही ठिकाणी कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड होईल, ही भीती नेहमी व्यक्त होत असते. पश्चिमकडील ठाकुर्ली ५२ चाळ परिसरात कचरा आणि डेब्रिज टाकून दुर्गंधी पसरत आहे. सदर जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याने पालिका तसेच रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत आहे.
जुनी डोंबिवली विभागातील गणेशघाट रस्त्यावरील बोगद्याच्या बाजूलाच कचाऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड तयार होत आहे. सकाळी वॉकसाठी जाणाऱ्या डोंबिवलीकरांना नाकावर रुमाल ठेवून बोगदा पार करावा लागतो. घंटागाडी माध्यमातून जमा होणार कचरा येथे डम्पिंग करण्यात येत असून प्लास्टिकवेचक या कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करतात.
महापालिका प्रशासनाने भिंती रंगवून ओला व सुका कचरा वेगवेगळा टाका, स्वच्छ राहा-स्वस्थ राहा, स्वच्छ भारत अभियान २०२२ अशा अनेक विषयांवर भिंती रंगवून स्वच्छता राखा, असे नागरिकांना धडे दिले आहेत. पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही. त्यामुळे फक्त भिंती रंगवून शहराची स्वच्छता होईल का? असा सवाल नागरिक करत आहेत.
जर अशा प्रकारच्या कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असेल आणि जर कचरा घंटागाडी कर्मचारी त्याला कारणीभूत ठरत असतील, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. त्या परिसराला भेट देऊन नक्की माहिती करून घेतो.
– वसंत डेगूलकर,स्वच्छता अधिकारी