लातूर : उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडाच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत महाविद्यालयाच्या सुमारे ३६ एकरच्या परिसरात संमेलन साजरे होत आहे.
या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथिदिडीने होणार असून यंदाच्या ग्रंथदिंडीची तीन खास वैशिष्टय़े आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या एका ग्रंथदिंडीचे नेतृत्व दुचाकीवर स्वार असणारे महिलांचे पथक करणार आहे. या पथकात घोडेस्वारी करणाऱ्या महिलाही असणार आहेत. ग्रंथिदिंडीचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे ‘गुगलविधी’ असून कर्नाटकातील ‘गुगल’ नृत्यप्रकारानुसार विवाहापूर्वी वाजत गाजत, नृत्य करत देवतेची पूजा करण्यात येते. हा विधी ग्रंथिदडीत अनुभवायला मिळणार आहे.
मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी ‘नवरंग’ दिंडी हे तिसरे वैशिष्टय़ असणार आहे. पाचशे शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. यासह ढोल, लेझीम, वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे १५० कलावंत ग्रंथदिंडीत सहभागी होणार आहेत.
उदगीरचे महाराष्ट्र उदगीर महाविदयालय पूर्णपणे शहरात आणि त्यांच्या महाविद्यालयात होणाऱ्या या अखिल भारतीय साहित्य सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थी एक दिलाने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत .महाविद्यालयातील सर्व विभागाची प्राध्यापक मंडळी आपल्या विद्यार्थ्याना घेऊन या साहित्यिक सांस्कृतिक सोहळयाला एक वेगळे आयाम देण्यास तत्पर झाले आहेत . काल झालेल्या अजय अतुल नाईट ला रसिकांनी मोठी गर्दी केली होती आज रात्री ” चला हवा येऊ द्या ” चा प्रयोग आहे. आज रात्रीची गर्दी उद्याच्या उद्गाटनच्या कार्यक्रमाला अधिक ऊर्जा देईल असे बोलले जाते.