वसई (वार्ताहर) : वीजचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन आरोपींना वसई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे दोन्ही आरोपी वसईतील अमाफ ग्लास टफ कंपनीचे (आयेशा कंपाऊंडजवळ, कामनगाव) भागीदार आहेत. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी व वालिव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
अब्दुल्ला आझाद हुजेफा आणि शब्बीर आसिर हुजेफा अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. वाशीच्या भरारी पथकाने ऑगस्ट २०२१ मध्ये छापा टाकून या कारखान्याची तब्बल ६ कोटी १७ लाख ७१ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली होती. अटकेतील दोन भागीदारांसह जागामालक व वीजचोरीत मदत करणाऱ्या एकजण अशा चौघांविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२१ मध्ये वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि, गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन सरकार व महावितरणच्या वतीने जोरदार विरोध झाल्याने दोन्ही ठिकाणी आरोपींचे अर्ज फेटाळले गेले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली व तपासी अधिकारी राहुलकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी शंकर उथडे, श्रीकांत पाटील यांनी आरोपींना अटक करून मंगळवारी (१९ एप्रिल) न्यायालयात हजर केले. सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक शिवाजी इंदलकर, मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या वतीने मूळ फिर्यादी असलेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे व सहाय्यक विधी अधिकारी राजीव वामन यांनी महावितरणची बाजू भक्कमपणे मांडून विशेष पाठपुरावा केला.