संतोष वायंगणकर
आशिया खंडामध्ये एकेकाळी दुसऱ्या क्रमांकावर एसटी महामंडळाचा क्रमांक लागत होता. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या जशा अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजा आहेत तशाच दळणवळणाच्या साधनांमध्ये सर्वसामान्यांची हक्काची असणारी एसटी ही होती आणि आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी संपावर उतरले. गेल्या पाच महिन्यांतील एसटीच्या संपाने कशी वळणं घेतली, काय-काय घडामोडी घडल्या हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तुटू नये याची काळजी घेऊनच ताणायचे असते; परंतु एसटीच्या या संपात कोणता विचार करून एवढं ताणलं गेलं हा खरं तर अखंड महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. यामध्ये १०५ कर्मचाऱ्यांचे बळी गेले. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. यात सरकारची भूमिका, अनास्था जशी कारणीभूत आहे तसे संपकऱ्यांचे धोरणही तितकेच जबाबदार आहे. अडीच वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपाच्या बाबतीत घेतलेली भूमिका, उचललेले पाऊल आत्मघातकीच ठरणारे होते. आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो तीच संस्था आपल्या हाताने उद्धवस्त करण्याचे काम कोणीच करायचे नसते. शेवटी ज्या संस्थेत आपण नोकरी करतो, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो ती संस्था उद्धवस्त करणे म्हणजे आपल्याच घराला आपणच आग लावण्याचा प्रकार करण्यासारखे होते. याचे भान, जाणीव कुणालाच नव्हत्या. उशिराने का असेना न्यायालयीन निकाल आणि निर्माण झालेल्या परिस्थितीतून एसटीचा हा संप मिटला. कोकणात एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. पाच महिन्यांनंतर खऱ्या अर्थाने एसटी रस्त्यांवरून पळायला लागली आहे. एसटी वाहतूक बंद असल्याने ग्रामीण जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. सर्वसामान्यांपासून सर्वांनाच दळणवळणाचे साधन म्हणून आधार असणारी एसटी पाच महिने बंद होती. काही कर्मचाऱ्यांनी सुज्ञपणा दाखवून काही एसटी बसेस चालू करण्याचा प्रयत्न केला. एसटी बंद असल्याने त्याचा विपरित परिणाम तालुक्याच्या ठिकाणांच्या मार्केटवर झाला. दर दोन दिवसांनी तालुक्याला येणारे पंधरा दिवसांनी शहरात येऊ लागले. मार्केटमधील उलाढालही रोडावली. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्यांना खासगी वाहनाने ये-जा करणेही परवडणारे नाही. विद्यार्थी, नोकरीवर जाणारे, वयोवृद्ध पेन्शनर, शेतकरी अशा सर्वांचेच हाल झाले. पहिल्यांदा जेव्हा काही मार्गांवर एसटी सुरू झाली तेव्हा ज्या प्रवाशांनी हाल सोसले त्यांनी चालक-वाहक नमस्कार करत आभार मानले. एवढं या एसटीशी सर्वसामान्य जनतेचं नातं घट्ट आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात केव्हा एकदा एसटी सुरू होते याच्याच प्रतीक्षेत लोक होते.
महाराष्ट्रात आठवडाभरात सर्वत्रच एसटी सुरळीत होणे अपेक्षित आहे. यापुढे एसटीच्या कर्मचाऱ्यांनीही अधिक चांगली सेवा देऊन पुन्हा एकदा प्रवासी एसटीशी कसा जोडला जाईल हे पाहिले पाहिजे. एसटीचा तोटा अधिकाऱ्यांच्या आणि सरकारच्या धोरणामुळे होत असला तरीही हा तोटा आणखी कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. इथेही संस्था जिवंत राहिली तरच आपणाला उभारी घेता येईल हे धोरण कर्मचाऱ्यांनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. शासन काय करतंय यापेक्षा आपण काय करतोय हे देखील महत्त्वाचे आहे. गेल्या अडीच वर्षांतील कोरोना महामारीने जी वाताहत झाली आहे त्यातून सुधारण्यासाठी काही अवघी लागेल. यात यापुढच्या काळात माज, उन्माद आणि मस्ती करून चालणारी नाही. फार सावधतेने वागलं, बोललं पाहिजे. हे केवळ एसटीच्या कर्मचाऱ्यांनीच नव्हे तर सर्वांनीच फार सावध असायला हवे आहे. कोरोना महामारीच्या संकटाने जर आपण काही शिकणार नाही तर मग आपणाला आपल्या आयुष्यात वेगळे धडे ते कोणते मिळणार! खरं म्हणजे गेल्या अडीच वर्षांत गर्भश्रीमंतांपासून झोपडीतल्या माणसांपर्यंत सर्वांनाच जगण्याचा संघर्ष कसा असतो हे शिकवलं. गेल्या अडीच वर्षांत ‘मध्यमवर्गीय गरीब’ असा एक नवा वर्ग या अडीच वर्षांत निर्माण झाला. नेहमीच ओढाताण होते ती या मध्यमवर्गीयांचीच. त्याला जगाबरोबर धावायचे असते. जर तो धावला नाही तर तो मागे पडतो. यासाठीच त्याची धावपळ असते. कोकणातील व्यावसायिकही एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू झाली यामुळे सुखावले आहेत. एसटी वाहतूक सुरू होण्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसून येतील. बाजारपेठांमध्ये वर्दळ वाढली की, उलाढालही वाढेल. कोकणातील पर्यटनालाही यातून चालना मिळेल. ज्यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही, असे असंख्य पर्यटक एसटीने प्रवास करतात हे पर्यटक कोकणात आले नव्हते ते पर्यटकही कोकणात येतील. एसटी वाहतूक सुरू होण्याचे परिणाम हे निश्चितच चांगलेच झालेले दिसतील.