Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

अंतराळातून पडलेले 'ते' अवशेष चीनच्या यानाचेच

अंतराळातून पडलेले 'ते' अवशेष चीनच्या यानाचेच

पुणे : काही दिवसांपूर्वी अंतराळातून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशच्या काही भागांत अवशेष कोसळले होते. ते अवशेष उपग्रह वाहून नेणार्या अवकाशयानाचे असून, ते चीनच्या यानाचेच आहेत, असा निष्कर्ष पुणे विद्यापीठातील 'आयुका'ने काढला आहे.


२ एप्रिल आणि त्यानंतर काही दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी, अमरावती आणि खान्देशातील काही भागांत अंतराळातून पेटते अवशेष आगीच्या लोळाच्या रूपात कोसळले होते. हे अवशेष उपग्रह वाहून नेणार्या अवकाशयानाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर पुण्यातील 'आयुका' संस्थेतील शास्त्रज्ञांनी अवकाशातून कोणत्या देशाच्या रॉकेटचे यंत्र त्या परिघातून जाणार होते, याचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यावेळी फक्त चीन या देशानेच रॉकेट सोडले असल्याचे सिद्ध झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास करून अवकाशातील बदलांबाबत अभ्यास करण्यासाठी पुण्यातील विद्यापीठात 'आयुका' उभी राहिली. चंद्रपुरात घडलेल्या घटनेनंतर 'आयुका'तील काही शास्त्रज्ञांनी केंद्र संचालक सोमक राय चौधरी यांच्या सूचनेनंतर यावर अभ्यास केला. येथील शास्त्रज्ञांनी दोन वर्षे सोडलेल्या सॅटेलाईटची माहिती जमा करून कोणत्या सॅटेलाईटची कक्षा कधी पृथ्वीच्या कक्षेतून जाणार आहे, यावर सखोल अभ्यास केला. त्यातून या निष्कर्षाप्रत पोहोचले आहेत.

Comments
Add Comment