Thursday, July 25, 2024
Homeकोकणरायगडमाथेरानमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली

माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली

व्यावसायिक चिंतेत

मुकुंद रांजाणे

माथेरान : माथेरानमध्ये सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. पण काही महिन्यांपासून पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवल्याने येथील स्थानिक चिंतेत दिसून येत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपासून जवळ असलेल्या माथेरानमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते, पण मागील जानेवारीनंतर येथे पर्यटकांची संख्या कमीकमी होत आहे.

विकेंडला हमखास फुल्ल होणाऱ्या माथेरानमध्ये शनिवारीही पर्यटकसंख्या कमी झालेली दिसून येत आहे. त्याचा सर्वात मोठा फटका स्थानिक लॉजिंग व्यावसायिकांना बसला आहे. येथील तरुणांनी लॉजिंग व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे, पण पर्यटकच कमी झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. त्यातच काहीजणांनी हॉटेल्स भाडे तत्वावर घेऊन अतिशय कमी किमतींमध्ये पर्यटकांना जेवणाबरोबर राहण्याची सोय करून दिल्याने स्थानिकांसाठी चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

तसेच नेरळ येथेच पर्यटकांना माथेरानसाठी रूम्स बुक करण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकावर मोठी फौज उभी राहत असून त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पर्यटकांना गळ घालून नेरळ येथेच रूम्स बुक करण्यात येत आहेत. यावेळी अनेकदा पर्यटकाला फोटो दाखवून रूम्स बुक करण्यास भाग पाडले जाते, पण प्रत्यक्षात चित्र वेगळे असते तेव्हा पर्यटकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. तथापि, त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा लोकांची भरभराट झालेली आहे.

माथेरानच्या प्रवेशद्वारावर अनेकदा पर्यटकांना पाच पॉईंट दाखवून मार्केटमध्ये सोडण्यासाठी मोठी रक्कम घेतली जाते. तसेच अनेकांना माथेरानमध्ये न राहता तुम्हाला स्वस्तामध्ये १८ प्रेक्षणीय स्थळे दाखवून पुन्हा टॉक्सिस्टॅण्डला सोडण्यात येईल, असे सांगून अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते. अशा फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली दिसून येत आहे. काहीजण तुम्हाला चांगले हॉटेल दाखवतो, असे सांगून स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी पर्यटकांच्या खिशाला चाट मारत आहेत. त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटनावर झालेला मागील काळात दिसून येत असून फसवणूक झालेला पर्यटक पुन्हा माथेरान नको, अशी शपथ घेऊनच येथून जात आहे व आपल्या सहकाऱ्यांनाही त्याचा अनुभव सांगत आहे.

माथेरानचे पर्यटन टिकवायचे असेल तर…

माथेरानचे पर्यटन टिकवायचे असेल तर अशा प्रवृत्तीना रोखले गेले पाहिजे. ज्यांना इथल्या पर्यटनाशी काहीही देणेघेणे नाही फक्त आपली तुंबडी भरायची ही भावना असलेल्या लोकांमुळे माथेरानचे पर्यटन रसातळाला जात आहे. त्याचा सर्वात मोठा फटका येथील स्थानिक दुकानदार, लॉजिंग व्यावसायिक अश्वचालक व हातावर पोट असलेल्यांना बसत आहे. म्हणून स्थानिकांनी पोलीस व पालिका प्रशासनाला बळ देऊन या प्रवृत्तींना रोखण्यास भाग पाडले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -