Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमालवणात शिवसेनेला धक्का

मालवणात शिवसेनेला धक्का

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

पत्रकार परिषदेतून केला निर्णय जाहीर

मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कांदळगावकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्नी स्मृती कांदळगावकर उपस्थित होत्या. ते म्हणाले की, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मालवण पालिकेत प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर नागरिकांनी आपल्याला बसवल्याबद्दल आपण जनतेचे आणि शिवसेनेने आपल्याला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे.

कुठलीही राजकीय स्पर्धा शह-काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा विकास कसा करता येईल, यासाठी मी प्रयत्न केले. हे करत असताना अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पण हा राजकारणाचा एक भाग म्हणून याला उत्तर प्रत्युत्तरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धीच्या मागे वेळ फुकट न घालवता जास्तीत जास्त शहराच्या विकास कामांकडे लक्ष दिले. चांगले काम करणाऱ्या व्यक्तीवर आरोप होणार आणि काम करणाऱ्या कडून चुका होणार हे सर्वश्रुत आहे. पण हे करत असताना जनतेची आणि माझ्या पक्षाची मान खाली जाईल, असे कोणतेही काम मागील पाच वर्षांत केले नाही, असे ते म्हणाले.

पालिकेत राजकीयविरहित काम करताना एक-दोन वेळा सभागृहात मतदानाचे ठराव वगळता मागील पाच वर्षांत सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात यश आले. विरोधकांच्या प्रभागात पण लाखो रुपयांची कामे करण्यात आली आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली.

रस्ते, गटारस्वच्छता या मूलभूत सोयी बरोबरच मालवणचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. तसेच मालवणच्या पाणी योजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे ४५ कोटी रुपयांची नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली. लवकरच त्याला अंतिम मंजुरी प्राप्त होणार आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -