विलास खानोलकर
एकदा एक मामलेदार बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस आले होते. त्यांच्याबरोबर एक डॉक्टरही होते. ते जातीने ब्राह्मण व रामभक्त होते. रामाशिवाय कोणालाही मानत नसत. म्हणून शिर्डीत येण्यापूर्वी ‘मी आपल्याबरोबर येईन, पण बाबा मुसलमान असल्यामुळे आपण मला त्यांना नमस्कार करायला सांगू नका,’ असे त्यांना आपल्या मामलेदार स्नेह्यांना अगोदरच सांगून ठेवले होते. शिर्डीत आल्यावर ते दोघे जेव्हा मशिदीत गेले तेव्हा मामलेदारांच्या अगोदर त्या डॉक्टरांनीच बाबांना साष्टांग नमस्कार घातला.
ते पाहून मामलेदारांना मोठेच आश्चर्य वाटले. थोड्या वेळाने त्यांनी डॉक्टरांच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, “अहो मशिदीत प्रवेश करताच मला समोरच्या गादीवर प्रत्यक्ष रामप्रभूच बसलेले दिसले. त्यांना पाहून मला राहवले नाही, मी तत्काळ लोटांगण घातले. त्यानंतर मला साईबाबा दिसू लागले. खरंच बाबा म्हणजे थोर महापुरुष आहेत. त्यांनी रामाचे व त्यांचे ऐक्य दाखवून माझे डोळे उघडले. मी त्यांना मुसलमान म्हणालो यात माझी चूक झाली.’’ त्यानंतर ‘बाबांची कृपा होत नाही तोपर्यंत मशिदीत पाऊल ठेवायचे नाही’ असा दृढनिश्चय करून ते शिर्डीतच उपाशी बसून राहिले. तिसऱ्या दिवशी अकस्मात त्यांना त्यांचा खानदेशातील एक स्नेही भेटला. त्याला पाहून डॉक्टरांना खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याच्याबरोबर तेही बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘काय रे मशिदीत येणार नव्हतास ना! मग आता कसा आलास?’ त्यावर डॉक्टर काय बोलणार? सर्वसाक्षी बाबांनी आपले मनोगत जाणलेले आहे हे पाहून ते पश्चात्तापाने रडू लागले आणि त्या क्षणी बाबांनी कृपा केली.