भविष्यात आ. नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री होतील : नापणे येथे जठार यांनी व्यक्त
केला विश्वास
वैभववाडी (प्रतिनिधी) : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशानंतरच जिल्ह्यात भाजप शतप्रतिशत हे नाकारून चालणार नाही. राणे साहेब यांच्या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योजक तयार करूया आणि उद्योगवर्ष जिल्हा पुढील वर्षी साजरा करूया असा संकल्प आपण आजच करूया, असा निश्चय आ. प्रमोद जठार यांनी केला.
जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू आहेत. ते पूर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक आमदार नितेश राणे प्रयत्न करत आहेत. त्यांची कामाची पद्धत चांगली आहे. भाजपची राज्यात सत्ता येताच आ. नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री पदावर असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नापणे ऊस संशोधन केंद्र आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जठार पुढे म्हणाले की, संशोधकांच्या म्हणण्यानुसार या भागात जवळपास पंधरा लहान-मोठी धरणे आहेत. सारासार विचार केल्यास भविष्यात कोकणातच साखर कारखाने जिवंत राहतील. त्यामुळे कोकणात दोन लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन झाले पाहिजे. हा प्रयोग आपण यशस्वी करूया, असे जठार यांनी सांगितले.
कोकिसरे रेल्वे फाटक येथील भुयारी मार्ग काम मंजूर आहे. केंद्राकडून तब्बल ६५ कोटी या प्रकल्पासाठी आले आहेत. या फाटकावर ६० रेल्वे गाड्या नेहमी ये-जा करतात. त्यामुळे बारा तास फाटक बंद असतो. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल, याचाही आजच संकल्प करुया, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात उद्योजक निर्माण करूया. जास्तीत जास्त उद्योग येतील यासाठी प्रयत्न करूया व उद्योग वर्ष जिल्हा साजरा करुया, असे जठार यांनी सांगितले. उपस्थित शेतकरी व भाजप पदाधिकारी यांनी आमदार जठार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.