भांडूप (वार्ताहर) : देशपातळीवरचे सात बेस्ट अॅवॉर्ड पटकवणाऱ्या महावितरणच्या उत्तम कार्यपद्धतीची मध्य प्रदेशात अवलंब करण्यासाठी मध्यप्रदेश वितरण कंपनीचे अधिकारी भांडूप परिमंडलाच्या दौऱ्यावर आले होते. महाव्यवस्थापक व शाखा प्रमुख, दक्षता विभाग, मध्य प्रदेश मध्य क्षेत्र विद्युत वितरण कंपनी, भोपाळ, आर. एन. एस. ठाकूर व मध्य प्रदेश पूर्व क्षेत्र विद्युत वितरण कंपनी, जबलपूरचे कार्यकारी अभियंता भांडार इम्रान खान आले होते. मुख्य अभियंता भांडुप परिमंडळ सुरेश गणेशकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
सर्वप्रथम, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी भांडुप परिमंडलाच्या कामाबाबत संगणकीय सादरीकरण केले. भांडुप परिमंडळात थकबाकी वसुली तसेच वीज चोरीच्या मोहीम राबविल्यामुळे भांडूप परिमंडलाची वितरण हानी कमी होऊन ६ टक्क्यांवर आली आहे. महाडच्या पुरात व तौक्ते चक्रीवादळानंतर युद्धपातळीवर काम करून एकाच दिवसात वीजपुरवठा पूर्वपदावर आणले.
तिरुमला हॅबिटॅट, ठाणे येथील महावितरणद्वारे लावलेल्या बस रायझर कोणत्या पद्धतीने काम करतो याबाबत साइटवर जाऊन त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. बस रायझर प्रणाली त्यांच्याकडे नसून या प्रणालीचे त्यांनी कौतुक केले. मध्य प्रदेशहून आलेले ठाकूर व खान यांना शाखा कार्यालय स्तरावर कशा पद्धतीने काम होते, याबाबत वैशाली नगर शाखा मुलुंड येथे सविस्तर माहिती देण्यात आली. भांडुप परिमंडलाच्या आवारात असलेले महापारेषण कंपनीचे २२०/२२ केव्ही जी. आय. एस उपकेंद्रातसुद्धा त्यांनी भेट दिली व शेवटी त्यांना महावितरणच्या स्काडा सेंटर येथे उपकार्यकारी अभियंता संगेलकर व मिथुन यांनी स्काडा प्रणालीबाबत सादरीकरण केले.
यावेळी महावितरण ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, भांडुप परीमंडलाच्या अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) शुभांगी कटकधोंड, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा. सं.) हविषा जगताप, मुख्यालयातील वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज धाभर्डे, भांडुप परिमंडलाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) देवेंद्र उंबरकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) प्रवीण काळे, मुलुंड विभागाचे कार्यकारी अभियंता दत्ता भणगे, ठाणे मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) सुनील माने व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.