पुणे : सिल्व्हर ओकवरील हल्ल्याप्रकरणी एसटी कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात होते. सुनावणीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली गेली. सध्या ते कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्यावर अडचणीत भर पडत असताना त्यांच्यावर पुण्यातही गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यासाठीचा तक्रार अर्ज पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने मिळून युट्यूब चॅनेलवर मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली व कुठून झाली यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
संविधानाने त्यांना बोलण्याचा जरी अधिकार दिला असला तरी त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी व जातीमध्ये वाद लावून समाजात अराजकता माजेल असं हे कृत्य असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.