औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागातील शताब्दीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉनच्या परिसरातील लाईट चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. चोरीची कबुली दे म्हणत ही मारहाण करण्यात आली.
मनोज शेषराव आव्हाड असे मृत तरुणाचे नाव असून शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील शताब्दी नगर भागातील एका माजी नगरसेवकाच्या लॉनमध्ये मनोज हा देखरेख करण्याचे काम करायचा. दरम्यान लॉनमधील दहा-पंधरा हजार किमतीची लाईट चोरीला गेल्याची घटना घडली होती. तर ही चोरी मनोज आव्हाड यानेच केली असल्याचा संशय घेऊन लॉन मालकाच्या मुलासह इतर चार-पाच लोकांनी बुधवारी रात्री लाठ्या-काठ्याने त्याला बेदम मारहाण केली होती.
मारहाणीनंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंचनामा करण्यात येत आहे. तर याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मनोज आव्हाड याला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. ज्यात चार-पाच जण मारहाण करताना पाहायला मिळत आहे. तर दोन जणांच्या हातात दांडके असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. मनोजचे पाय बांधून त्याला दांड्याने बेदम मारहाण होत असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत असून, याच मारहाणीमूळे त्याचा मृत्यू झाला आहे.






