नवी मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुरुवारी (२१ एप्रिल) चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे आजी-माजी कर्णधार आमनेसामने आहेत. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या लढतीतील दोन्ही संघ एकाच नावेतील प्रवासी आहेत. चेन्नई आणि मुंबई संघ ताज्या गुणतालिकेत तळाला आहेत. रवींद्र जडेजा आणि सहकाऱ्यांनी ६ सामन्यांत केवळ एकच सामना जिंकलेला आहे. चार सामन्यांच्या पराभवांच्या नामुष्कीनंतर बंगळूरुविरुद्ध सूर गवसला तरी मागील लढतीत गुजरातविरुद्ध पुन्हा मात खावी लागली. त्यामुळे सुपरकिंग्ज २ गुणांसह नवव्या स्थानी आहेत. सलग ६ सामन्यांनंतर माजी विजेता मुंबईचा नन्नाचा पाढा कायम आहे. यंदाच्या हंगामात पराभवाच्या षटकाराची नामुष्की ओढवलेला तो पहिला संघ ठरला आहे.
सहा सामन्यांनंतर गुणांचे खाते उघडण्याची प्रतीक्षा असलेल्या मुंबईसमोर सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याचे आव्हान आहे. सूर्यकुमार यादवने ४ सामन्यांतून २ तसेच ईशान किशनने ६ सामन्यांतून तितकीच अर्धशतके झळकावताना बऱ्यापैकी फॉर्म राखला तरी कर्णधार रोहित शर्मा (६ सामन्यांत ११४ धावा), तिलक वर्मा (६ सामन्यांत १८३ धावा), अष्टपैलू कीरॉन पोलार्ड (६ सामन्यांत ८२ धावा), डिवाल्ड ब्रेविस (६ सामन्यांत ११७ धावा) हे प्रमुख बॅटर्स सुपरफ्लॉप ठरलेत. अमोलप्रीत सिंग आणि डॅनियल सॅम्स यांनीही निराशा केली आहे. त्यात माजी विजेत्यांची गोलंदाजीही पुरती ढेपाळली आहे. ६ सामन्यांत सर्वाधिक ६ विकेट लेगस्पिनर मुरुगन अश्विनच्या आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि जयदेव उनाडकट (६ सामन्यांत प्रत्येकी ४ विकेट) तसेच बसिल थम्पी (६ सामन्यांत ५ विकेट) आणि टायमल मिल्स यांना (५ सामन्यांत ६ विकेट) लौकिकाला साजेशी बॉलिंग करता आलेली नाही.
चेन्नईची कामगिरीही मुंबईसारखीच आहे. शिवम दुबे व रॉबिन उथप्पाने (प्रत्येकी २ अर्धशतक) पन्नाशी पार केली तरी ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, कर्णधार रवींद्र जडेजा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ड्वायेन ब्राव्होला अपेक्षित फलंदाजी करता आलेली नाही. बॉलिंगमध्ये मध्यमगती गोलंदाज ब्राव्होने ६ सामन्यांत १० विकेट घेतल्या तरी कॅप्टन जडेजा, मुकेश चौधरी, ख्रिस जॉर्डन व महिष तीक्षणाकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा विजयीपथावर परतायचे असेल, तर चेन्नईला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुरेख कामगिरी करावी लागेल.
मुंबईचे पारडे जड, पण…
मागील पाच लढतींचा निकाल पाहिल्यास मुंबईने चेन्नईवर ३-२ अशी आघाडी घेतली आहे. गत हंगामातील परतीच्या लढतीत बाजी मारताना चेन्नईने प्रतिस्पर्ध्यांची सलग दोन विजयांची मालिका खंडित केली. चेन्नई सातत्य राखण्यास उत्सुक आहे. दुसरीकडे, मुंबई मागील पराभवाचा बदला घेण्यास आतुर आहे.
वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई