Friday, December 13, 2024
Homeमहामुंबईघणसोलीतील भाजी मार्केट अन्यत्र हलवल्याने मनसे आक्रमक

घणसोलीतील भाजी मार्केट अन्यत्र हलवल्याने मनसे आक्रमक

नवी मुंबई (प्रतिनिधी) : घणसोली येथील साई सदानंद व गणेश नगर परिसरात असलेला भाजी बाजार एका बाजूला व्यवस्थितरीत्या बसविलेला होता. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही समस्या उद्भवत नव्हत्या; परंतु मंगळवारी अचानक पालिकेकडून सुस्थितीत बसविलेले भाजी मार्केट पुन्हा रस्त्याच्या कडेला बसविले गेल्यामुळे नागरी समस्या वाढल्या आहेत. म्हणून भाजी मार्केट जेथे होते, त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी नवी मुंबई मनसे व काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

साई सदानंद नगर व गणेश नगरमधून डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला भाजी मार्केट भरत होते. यामुळे वाहतुकीची समस्या, नागरिकांच्या गर्दीने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच अपघातही झाले होते. म्हणून भाजपचे पदाधिकारी गणेश सकपाळ व त्यांच्या पथकाने महिन्यांपूर्वी पालिकेच्या सहकार्याने रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेवर योजनाबद्ध व कुणावरही अन्याय होणार नाही, हा दृष्टिकोन ठेवून पालिकेच्या अनुमतीने भाजी मार्केटचा एक प्रकारे पुनर्विकास केला.

यामुळे रस्त्यावर होणाऱ्या समस्या एका मिनिटात समाप्त झाल्या. यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी, ग्राहक व व्यावसायिक आनंदात होते; परंतु मंगळवारी सायंकाळी पालिका प्रशासनाने पोलीस फौजफाटा, सुरक्षा रक्षकासह भाजी मार्केटचा ताबा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व संताप पाहायला मिळाला.

रस्त्याच्या कडेला बाजार असल्याने नागरिकांना फारच त्रास होत होता. अपघाताच्या घटनादेखील घडल्या होत्या. म्हणून येथील शेकडो नागरिकांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या कानावर घालून सुरक्षित जागेवर भाजी मार्केट बसविले होते. – गणेश सकपाळ, भाजप पदाधिकारी, नवी मुंबई

येत्या तीन दिवसांत पालिकेने ज्या ठिकाणी बाजार सुरक्षितरीत्या बसविला होता. त्याच ठिकाणी बसवावा. नाहीतर मनसे स्टाईलने कार्यवाही करण्यात येईल आणि त्याला जबाबदार पालिका प्रशासन असेल.
– संदीप गलगुडे, संघटक, मनसे-नवी मुंबई

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -