Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

दिल्लीत ओमायक्रॉनचे ९ उपप्रकार आढळल्याने खळबळ

दिल्लीत ओमायक्रॉनचे ९ उपप्रकार आढळल्याने खळबळ

नवी दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने देशाची राजधानी दिल्लीत थैमान घातले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनच्या BA 2.12 व्हेरिएंटसह इतर आठ उपप्रकार दिसून आले आहेत. नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अभ्यासानंतर ही बाब समोर आली आहे. याआधी बुधवारी एक अहवाल समोर आला होता की, जानेवारी ते मार्च या काळात दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी ९७ टक्के लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली होती.


देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सरकार आणि सर्वसामान्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेषत: राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाचे 1009 रुग्ण आढळले. एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. तर मंगळवारी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे 600 हून अधिक होती. अशाप्रकारे दिल्लीत कोरोनाने जोर पकडला असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.


गुरुवारी जीनोम सिक्वेन्सिंगच्या अभ्यासात धक्कादायक बाबी समोर आल्या. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, नवी दिल्लीतील कोरोना चाचणीच्या नमुन्यांच्या अभ्यासात ओमायक्रॉनच्या एकूण 9 प्रकारांची उपस्थिती उघड झाली आहे. ज्यात BA.2.12.1 देखील आहे. महत्त्वाचे म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की ओमायक्रॉनचे BA.2 उप-प्रकार BA.1 पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, काळजी करण्यासारखे फार काही नाही. आतापर्यंत, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनचे पाच उपप्रकार त्यांच्या वॉच लिस्टमध्ये ठेवले आहेत - BA.1, BA.1.1, BA.2, BA.4, BA.5.


दरम्यान, दिल्लीत कोविडची प्रकरणे वाढत आहेत, परंतु रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. 99 टक्के कोरोना बेड रिकामे आहेत. एलएनजेपीमध्ये सात रुग्ण दाखल आहेत. चार महिन्यांचे बाळ ऑक्सिजन सपोर्टवर आहे. आई-वडिलांनी लस न घेतल्यास मुलांना कोरोनाचा धोका असू शकतो असे दिल्लीतील एलएनजेपी हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment