मुंबई (प्रतिनिधी) : मालदीवचे शिक्षण राज्यमंत्री अब्दुल रशीद अहमद यांनी मुंबई महापालिकेच्या वरळी सीफेस शाळेला भेट दिली. दरम्यान महापालिका शाळेच्या अत्याधुनिक सुविधा पाहून त्यांनी महापालिकेचे कौतुक केले, तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांचे पालक हे निश्चितच भाग्यवान आहेत असे उद्गार त्यांनी काढले.
या प्रसंगी सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी, उप शिक्षणाधिकारी संजीवनी कापसे, शाळेच्या मुख्याध्यापिका निशा म्हात्रे व बागेश्री केतकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान सर्वप्रथम मालदीवचे शिक्षण राज्यमंत्री यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड पथकाने संगीत धून वाजवून स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी शाळेतील सभागृहात आयोजित प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, टाकाऊपासून टिकाऊ या अंतर्गत तयार केलेल्या विविध वस्तू, विविध खेळांची आणि योगासनांची प्रात्यक्षिके, संगीत कला, सुतार काम, शिवणकाम इत्यादींची प्रात्यक्षिके, स्काऊट गाईडच्या कार्यक्रमांशी संबंधित बाबींचा समावेश होता.
प्रयोग शाळा, टिंकरिंग लॅब इत्यादींना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये असणाऱ्या व्यवस्थेचेही कौतुक केले.