पुणे : रूबी हॉल क्लिनिकमधील मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणाची चौकशी करून याबाबतचा अहवाल ५ मे किंवा त्यापूर्वी दाखल करावा, असे आदेश येथील न्यायालयाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यास दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. के. बिराजदार यांनी हा आदेश दिला.
मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. मात्र मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्यानंतर पैसे न देता फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.
ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रूबी हॉल क्लिनिकमध्ये झाली. त्यामुळे या प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकची सखोल चौकशीची मागणी करणारा अर्ज मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आला होता. याबाबतचे काही पुरावे दोन्ही संस्थाकडून न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश कोरेगाव पार्क पोलिसांना दिला आहे.