Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

बेस्ट चालक संपावर गेल्यामुळे बस सेवा बंद

मुंबई : मुंबईतील वडाळा, कुर्ला आणि वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट बस चालक संपावर गेले आहेत. कंत्राटदार कंपनीने वेतन वेळेवर न दिल्याने चालकांनी संप पुकारला आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालय मार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद असल्याने प्रवाशांचे तसेच रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. दरम्यान, बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी बोलणी केली. बेस्ट प्रशासन बेस्टचे इतर नियमित कामगार नेमून बेस्ट बस सेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.


भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गेले सहा महिने झाले हा प्रॉब्लेम सुरु आहे. कंपनीतून याबाबत कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. कंपनीने आमच्याशी संवाद साधून जर आम्हाला म्हटले की, आम्हाला तुमची गरज आहे, आम्ही तयार आहोत पण तुम्ही आम्हाला कोणतीही कल्पना देत नाहीत.


कंपनीचे जे प्रतिनिधी आमच्याशी संवाद साधायला येतात ते आमच्याशी व्यवस्थित संवाद करत नाहीत. आम्हाला जर पगारासाठी एक तारीख दिली असेल तर त्या तारखेला आमचा पगार झालाच पाहिजे. आम्ही सगळे कामगार आहोत. आम्ही मोठ्या कष्टाने काम करतो आहोत. त्यावरच आमचे घर चालते, आमच्या घरी येऊन परिस्थिती बघा.


प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. आज शिवसेनेचे आमदार आहेत, मुख्यमंत्री आहेत. तुमच्या हातात सगळे आहे. परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. आम्हाला न्याय मिळाला नाही तर स्थिती बदलायला वेळ लागणार नाही. पगार आजच्या आज करा तरच गाड्या काढणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment