Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेदिवावासीयांचा मडकी फोडत पाणी टंचाईविरोधात संताप

दिवावासीयांचा मडकी फोडत पाणी टंचाईविरोधात संताप

भाजपची महापालिका मुख्यालयावर धडक

ठाणे (प्रतिनिधी) : दिवा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात भाजपने महापालिका मुख्यालयावर बुधवारी ‘पाणी हक्क मोर्चा’ काढला. या मोर्चात दिवावासीयांनी मडकी फोडून पाणीटंचाई विरोधातील सत्ताधारी व महापालिका प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त केला. तसेच पाणीटंचाईवर तोडगा न काढल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात प्रदेश सचिव संदीप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, महिला आघाडीच्या प्रमुख मृणाल पेंडसे, मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, ज्योती राजकांत पाटील यांच्यासह शेकडो दिवावासीय सहभागी झाले होते.

दिवा परिसरातील पाणीटंचाईविरोधात यापूर्वी दिव्यात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र पाणीटंचाई कायम राहिल्यामुळे नितीन कंपनी जंक्शनहून महापालिका मुख्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढण्यात आला. पाणी आमच्या हक्काचे, पालकमंत्री हाय हाय, पाणीटंचाई न सोडविणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा नागरिकांकडून देण्यात आल्या. दिवा बोलणार, असे फलक झळकवित पाणीटंचाईच्या निषेधार्थ मडकी फोडून संताप व्यक्त केला.

मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यावेळी टंचाईग्रस्त भागासाठी टँकररद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले. दिवावासीयांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. त्यासाठी भाजपकडून सातत्याने लढा दिला जाईल, अशी माहिती आ. रवींद्र चव्हाण यांनी दिली. या पुढील काळात हा प्रश्न न सुटल्यास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. निरंजन डावखरे यांनी दिला.

आता मडकी फोडून आंदोलन केल्याने कधीतरी राज्यातील सत्ताधारी व प्रशासनाचे डोके ठिकाणावर येईल, अशी अपेक्षा आहे. तहानलेल्या दिव्यासाठी आणखी लढा तीव्र केला जाईल, असा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला. दिव्यातील जनतेसाठी बांधलेले ई-टॉयलेट तोडले गेले. जनतेविषयी आस्था नसल्याची टीकाही या वेळी केळकर यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -