जव्हार ग्रामीण (वार्ताहर) : जव्हार शहरातील आधारकार्ड सेंटर गेल्या आठवडाभरापासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अधिकृत ओळखपत्र अशी ओळख झालेला आधारकार्ड हा पुरावा प्रत्येक शासकीय कार्यालयात अथवा आपली स्वतःची ओळख पटवण्यासाठी सर्रासपणे वापरण्यात येतो. तथापि, जव्हार शहरातील आधारकार्डचे सर्व सेंटर गेल्या सात दिवसांपासून नागरिकांना कोणतीही पूर्व कल्पना न देता बंद असल्याने ग्रामीण भागातील जनतेला नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, शासकीय दाखल्यांसाठी आधारकार्ड अनिवार्य व सक्तीचे असून ते नूतनीकरण करणे, नवीन काढणे, जन्मतारीख, पत्ता, फोटो बदलणे अशा प्रकारचे बदल करण्यासाठी नेहमीच आधार सेंटरवर रांगा असल्याच्या दिसतात.
त्यातच जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा व महाविद्यालये यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले, शासकीय दाखले काढण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे असून नागरिकांना अशा आधारकार्डवर काही बदल करावयाचे असल्यास अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील आधार सेंटर चालू करावेत, अशी मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे.
सध्या तालुक्यातील सर्व आधार सेंटर बंद असून प्रशासनाने याची दखल घेऊन नागरिकांना होणारा नाहक मनस्ताप दूर करावा. – भूषण शिरसाट, जिल्हा समन्वयक, युवा सेना