
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून गाळ काढणे व इतर कामे हाती घेतली आहेत. यावर्षी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी शहर भागातील नालेसफाई कामांची गुरुवारी पाहणी केली.
यावेळी जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, एफ/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे आणि पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी सर्वप्रथम सकाळी एफ/दक्षिण विभागातील वडाळा, शीव भागातील रावळी नाला, जे. के. केमिकल नाला, महानगर गॅस पाईपलाईन नाला, प्रतीक्षा नगर नाला, पेरीफेरी नाला या मोठ्या व छोट्या नाल्यांची पाहणी केली. तर दुपारी जी/उत्तर विभागातील धारावी परिसरातील निसर्ग पार्क उद्यानालगत असलेला मोठा नाला, नाईक नगर नाला, बुद्धनगर नाला आणि काळा किल्ला नाला येथील कामांची पाहणी केली.
तसेच डॉ. संजीव कुमार यांनी नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.