कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, ई प्रभागात सहा. आयुक्त भारत पवार यांनी नांदिवली, भोपर रोड, चर्च गल्ली येथील विकासक तमशेर यादव, जागामालक अशोक म्हात्रे यांच्या तळ ७ मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर मंगळवारी निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबी, ४ कॉम्प्रेसरच्या सहाय्याने करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे ग प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी आयरेगाव येथील स्मशानभूमी जवळील दिलीप पंढरीनाथ पाटील यांचे तळ २ मजली आरसीसी इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर नुकतीच धडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने व १ ब्रेकर, १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येत आहे.
आय प्रभागातही सहा. आयुक्त संजय साबळे यांनी कल्याण पूर्व, चिंचपाडा येथील तळ ३ मजली इमारतीवर धडक कारवाई करण्यात आली. या इमारतीस २०२० मध्ये नोटीस बजावण्यात आली असून सदर इमारत अनधिकृत घोषित करण्यात आली आहे. तसेच विकासकावर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.