सोलापूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री यात्रेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्तीनंतर झालेल्या चैत्री यात्रेच्या कालावधीत मंदिर समितीच्या उत्पन्नात २०१९ च्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. यंदाच्या यात्रेत दोन कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला वर्षांतील प्रमुख चार यात्रांच्या काळात मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यावर समितीच्या वर्षभराच्या खर्चाचे नियोजन होते. मात्र, दोन वर्षे कोरोना व लॉकडाऊनमुळे मंदिर बंद होते. या काळात दोन आषाढी, दोन चैत्री, दोन माघी आणि एक कार्तिकी यात्रा रद्द करावी लागली. शिवाय मंदिर बंद असल्याने आर्थिक उत्पन्न ठप्प झाले होते. निर्बंधमुक्तीनंतर यंदा चैत्री यात्रा झाली. या यात्राकाळात सुमारे पाच ते सहा लाख भाविक येऊन गेले. परिणामी मंदिर समितीचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे.