नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये आता ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जाणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांनाही दिले जात आहे आणि इतर विभागाने त्याबाबत कारवाई करावी, असे पत्रही नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी संबंधित विभागांना दिले आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये भोग्यांबाबत एक नवीन पाऊल उचलण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे भोंग्यांवरून चांगलेच आक्रमक झाले असून आता भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश त्यांनी काढल्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. पोलीस आयुक्त पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्यांचे डेसीबील मोजले जाणार आहेत. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम यावर काम करणार असून त्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकारी हे धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबल एकत्रित मोजणार आहेत. तसेच नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तत्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश प्रदूषण मंडळाला देण्यात आले आहेत. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक मशीद, मंदिर, गुरुद्वार, चर्च व इतर धार्मिक स्थळांना भोंगे, ध्वनिप्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करून लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्याचा वापर करावा. सदर आदेश ३ मे २०२२ पासून अमलात येईल, असे परिपत्रक आयुक्त दीपक पांडेय यांनी नुकतेच जारी केले.
या अध्यादेशात असे नमूद केले आहे की, मनसेला मशिदी समोर हनुमान चालिसा पठणाचा अधिकार नसून फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्याचा सदर प्रयत्न असून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मशिदींच्या १०० मिटर परिसरात ध्वनी क्षेपकाद्वारे अजानच्या पाचही वेळी १५ मिनिटे आधी व नंतर हनुमान चालीसा किंवा कुठल्याही प्रकारचे भजन,गाणे किंवा इतर भोंगे प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. कुणालाही भोंगे वाजवण्यास परवानगी हवी असेल त्यांना ३ मे पर्यंत मुभा देण्यात आली आहे. सदर आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.