वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील बिलोशी गावातील विद्युत ट्रान्स्फॉर्मर रात्रीच्या सुमारास चोरीला गेला असून गावातील नागरिकांवर अंधारात झोपण्याची वेळ आली आहे. या ट्रान्सफॉर्मरमध्ये लाखो रुपयांची तांब्याची तार वापरली जात असल्याने या तारेसाठी ट्रान्स्फॉर्मर चोरी केला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वी ट्रान्सफॉर्मर चोरांना वाडा पोलिसांनी अटक केली होती. तरीही हे चोरीचे सत्र चालूच असून या चोरांची गंगा असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाडा तालुक्यातील बिलोशी या गावातील चालू असलेला वीजपुरवठा बंद करून रात्रीच्या सुमारास येथील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मंगळवार दि. १९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला.