Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कोरोनाचा धोका टळलेला नाही, निष्काळजीपणा नको, मास्क घाला

कोरोनाचा धोका टळलेला नाही, निष्काळजीपणा नको, मास्क घाला

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंट आणि कोरोनाच्या नव्या लाटेची भीती वाढली आहे. अशा परिस्थितीत, मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं यासारख्या कोरोना नियमांचं पालन करणे आवश्यक असल्याचे आयसीएमआर मधील महामारी विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. तसेच लोकांना लस घेण्याचे आणि कोरोना महामारीशी संबंधित इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनामुळे देशभरात तब्बल 5 लाख 22 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आतापर्यंत कोरोनाचे कोणतेही नवीन व्हेरिएंट समोर आलेले नाही, असे सांगितले. मात्र जे लोक वृद्ध आहेत, ज्या लोकांनी अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही आणि ज्या लोकांना लागण झाली आहे, त्यांनी फेस मास्क वापरावा. मला वाटत नाही की या व्हायरसचा सध्याचा संसर्ग हा कोरोनाची चौथी लाट आहे. कोरोनाच्या सब व्हेरिएंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आहेत. कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही आपण मास्क वापरत आहोत.

तर आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाने सांगितले की, वाढत्या सामाजिक उपक्रमांमुळे, मास्क न घालणे आणि खबरदारी न घेणे यामुळे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. प्राध्यापक अग्रवाल यांनी असेही म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही चिन्हे नाहीत. याशिवाय, एपिडेमियोलॉजिस्ट आणि इतर तज्ञांनी लोकांना मास्क लावावे आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून संसर्गाचा संभाव्य धोका टाळता येईल.

दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची सक्रिय प्रकरणे वेगाने वाढली आहेत, त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे काही राज्यांची डोकेदुखीही वाढली आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment