नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील गौरकामत गावातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तीन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्या शाळकरी मुलीची फसवणूक करून या तरुणांनी बलात्कार केला असून या प्रकरणी कर्जत पोलिसांनी २० ते ३० वयोगटातील १० तरुणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या त्या सर्व आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गौरकामत गावातील १३ वर्षांच्या शाळकरी मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट होते. सदर मुलीसोबत याच गावातील काही तरुणांशी ओळख झाली. त्यानंतर मार्च २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या शाळकरी मुलीसोबत त्या तरुणांनी मैत्री करण्याचे नाटक करून ओळख वाढवली व इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून वेगवेगळ्या मागण्या करू लागले.
याच गावातील काही तरुणांनी आग्रह केल्यानंतर त्या मुलीच्या आक्षेपार्ह फोटोंचे शूटिंग केले. गौरकामत गावातील आठ आणि शिरसे तसेच जंभिवली गावातील प्रत्येकी एक अशा १० तरुणांनी त्या मुलीसोबत लगट केली. काहींनी ते शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि बलात्कार केल्याची घटना घडली.
आपल्यावरील अत्याचारामुळे व बदनामी सुरू झाल्याने या मुलीने पालकांसह सोमवारी १८ एप्रिल रोजी कर्जत पोलीस ठाणे गाठून आपल्यावर अनेकांनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी तत्काळ कार्यवाही केली. कर्जत पोलिसांनी त्या शालेय मुलीच्या तक्रारीनुसार १० तरुणांना रात्रीच ताब्यात घेतले.
गौरकामत गावातील व शिरसे तसेच जांभिवली गावातील १० तरुणांवर पोलिसांनी बलात्कार आणि मुलीची फसवणूक केल्याप्रकरणी ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला. सर्व १० आरोपींना पोलिसांनी पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.