नवी दिल्ली (हिं.स.) : सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा यांना आम आदमी पार्टीच्या (आप) विरोधात बोलणे चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही नेत्यांना आपची सत्ता असलेल्या पंजाब पोलिसांनी समन्स बजावले आहे. कुमार विश्वास आणि अलका लांबा दोघेही पूर्वी ‘आप’ पक्षामध्ये होते आणि सातत्याने विरोधात बोलत असतात.
यासंदर्भातील माहितीनुसार गाझियाबादच्या वसुंधरा सेक्टर-3 येथील कुमार विश्वास यांच्या घरी बुधवारी सकाळी 7 वाजा पंजाब पोलिसांचे पथक धडकले. विधानसभा निवडणुकीदरम्यान आपच्या विरोधात बोलल्याबद्दल कुमार विश्वास यांच्यावर भादंविचे कलम 153, 153A, 323, 341, 506, 120B अन्वये रोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्याविरोधात कुमार विश्वास यांनी सार्वजनिक केलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर खलिस्तानवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
कुमार विश्वास यांना समन्स बजावल्यानंतर पंजाब पोलिसांनी काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे. पंजाब पोलीस सकाळी कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचल्यानंतरही अलका लांबा यांनी ट्विट केले होते की, “आता समजले की आम आदमी पार्टीला पोलिसांची गरज का होती. विरोधकांना धमकावण्यासाठी आणि दाबण्यासाठी. केजरीवाल जी, थोडी लाज बाळगा.” असे लांबा यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केलेय. त्यानंतर दुपारी 1 वाजता लांबा यांनी ट्विट करत सांगितले की, “पंजाब पोलिस माझ्या घरी पोहोचले आहेत…”
भगवंत मान तुम्हाला धोका मिळेल- कुमार विश्वास
पंजाब पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर कुमार विश्वास यांनी ट्विट करत म्हंटले की, “पहाटे पंजाब पोलीस दारात आले आहेत. माझ्याकडून पक्षात घेतलेल्या भगवंत मान यांना मी इशारा देतो की, दिल्लीत बसून ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, तो एक दिवस तुमची आणि पंजाबची फसवणूक करेल. तसेच.. देशाने देखील माझा इशारा लक्षात ठेवावा.” असे कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.