नवी दिल्ली : हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे महापालिकेकडून आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून अतिक्रमणाविरोधात बुलडोजर चालवले जात होते. येथे कुठलीही हिंसा घडू नये यासाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने तत्काळ आदेश दिल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली आहे.
जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. या भागात जमावबंदी लागू असतानाच आज महापालिकेने मोठी कारवाई केली.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही महापौरांना पत्र लिहून जहांगीरपुरीतील बेकायदेशीर बांधकामे काढण्याची मागणी केली होती. या पत्राची एक प्रत महापालिका आयुक्तांनाही पाठवण्यात आली. त्यानंतर भाजपशासित महापालिकेने या भागात आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बुलडोजरने घरे पाडण्यास सुरुवात केली होती. या कारवाईवरून आपने भाजपवर जोरदार टीका केली. तसेच औवेसी यांनी देखील भाजपचा समाचार घेतला.
भाजपने गरिबांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे, असे ओवैसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अवैध धंदे हटवण्याच्या नावाखाली हे लोक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश प्रमाणे दिल्लीतही गरीबांची घरे तोडत आहेत. या लोकांना नोटीसही देण्यात आली नाही. गरीब मुस्लिमांना शिक्षा दिली जात आहे. कारण त्यांनी जगण्याचे धाडस दाखवले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ओवैसी म्हणाले.
यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचे पीडब्ल्यूडी विभाग या मोहिमेचा एक भाग आहे का? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला. जहांगीरपुरीच्या जनतेने त्यांना मतदान केले नाही का? ही कारवाई म्हणजे या लोकांचा विश्वासघात नाही का? हा सरकारचा भ्याडपणा आहे. पोलिस देखील गरीब जनतेच्या पाठिशी नाहीत, असेही ओवैसी म्हणाले.