मुंबई : लाऊड स्पीकर बंदीच्या वादानंतर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजवू नये, अर्थात वाजवलं तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश मुंबई पोलिसांनी काढले आहेत. सायलेंट झोनमधल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी नाही तसेच अवैध बांधकाम असलेल्या धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरची परवानगी मिळणार नाही, असे आदेशही पोलिसांनी निर्गमित केले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सची मुंबई पोलिसांनी सक्त अंमलबजावणी करणं सुरु केली आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांची स्वतंत्र टीम तयार केली गेली आहे. एखाद्या भागात रात्री १० ते सकाळी ६ वाजताच्या दरम्यान जर भोंगा वाजला तर आणि संबंधित तक्रार जर कंट्रोल रुमला आली तर पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहेत.
तसेच मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी अशा कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय दंड विधान संहिता कलम १४४, १४९ आणि १५१ अंतर्गत समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासंबंधीची तयारी मुंबई पोलिस करत आहे. काही लोकांना आधीच यासंबंधित याआधीच नोटीस बजावण्यात आली आहे.