Friday, May 9, 2025

ठाणे

ठाणे शहरात रस्त्यालगत शौचालयांची वानवा

ठाणे शहरात रस्त्यालगत शौचालयांची वानवा

ठाणे (प्रतिनिधी) : विकासाच्या स्पर्धेत ठाणे शहर राज्यात प्रथम क्रमांकावर असून स्मार्ट सिटीकडे या शहराची वेगाने वाटचाल सुरू आहे; परंतु सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीत ठाणे शहर नापासाच्या यादीत आहे. ठाणे शहरात सध्या विकासकामांचा डंका पिटला जात आहे. उड्डाणपूल सिमेंटचे रस्ते आणि नाक्यानाक्यांवर रंगवण्यात आलेल्या रंगीबेरंगी आकर्षक चित्रे असलेल्या भिंती शहर सुंदर असल्याचे भासवत असल्या तरी या स्मार्ट शहराचे वास्तव वेगळेच आहे. ठाणे शहरात काही रस्त्यांचा अपवाद वगळता महापालिका हद्दीत सार्वजनिक शौचालये पुरेशा संख्येने उपलब्ध नाहीत.


विशेषकरून मुख्य रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला वाहनचालकांसाठी ठाण्यात योग्य अंतरावर स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. या ठिकाणी महिला आणि अपंग प्रवासी यांच्यासाठी मूलभूत गरज असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज आहे. त्या संदर्भात ठाणे महापालिकेने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ठाणे शहराचा विस्तार वेगाने होत आहे.

जुने ठाणे आपली वेस बदलून घोडबंदरच्या पलीकडे विस्तारत आहे. घोडबंदर रोडवर गगनाला भिडणाऱ्या उंच इमारती पाहून ठाणे शहराची श्रीमंती नजरेत भरते, परंतु या परिसरात स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृहांची वानवा आहे. या मूलभूत गरजेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुढील काळात शहराच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने रस्त्यालगत १५ शौचालये बांधण्याचे निश्चित केले होते; परंतु अपुरा निधी आणि स्वच्छतागृह बांधण्यासाठी पुरेशा जागेची अन् उपलब्धता यामुळे महापालिकेस आवश्यकच त्या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यास अडचणी येत आहेत. स्वच्छता अभियानावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या ठाणे महापालिकेने पुढील काळात स्वच्छतागृह निर्माण करण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ठाणेकर नागरिकांचे म्हणणे आहे.

ठाणे शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, त्याचप्रमाणे मुंबईला खेटून असलेल्या या शहरात नागरिकांची वर्दळ आणि वाहनांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते. शहरात रस्त्यांचे आणि महामार्गाचे जाळे अफाट आहे. महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जात असल्याने राज्यातील इतर भागांत जाण्यासाठी ठाणे शहर वाहनांसाठी केंद्रबिंदू आहे; परंतु शहरातील मुख्य मार्गानजीक पुरेशा संख्येने स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची कुचंबणा होते.


स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत ठाणे घोडबंदर परिसरातील आनंद नगर ते कासारवडवली परिसरात १५ स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन होते, परंतु कोरोना काळात या योजनेवर आवश्यक ती कार्यवाही होऊ शकली नाही आणि योग्य जागा आणि निधी यामुळे ही योजना बारगळली गेली अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या परिसरात महत्त्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक मुताऱ्या नाहीत. महिलांसाठी तर बोटावर मोजण्याइतपत मुताऱ्या सुस्थितीत आहेत.

Comments
Add Comment